Savaniee Ravindrra

सुस्वागतम

गायिका सावनी रविंद्र हिच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमचे स्वागत

सावनी रविंद्र भारतीय संगीतसृष्टी,विशेषतः मराठी संगीतक्षेत्र, यांमधील नामवंत गायिका आहे.

"होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिके मध्ये गायलेल्या "तू मला,मी तुला गुणगुणू लागलो पांघरु लागलो सावरू लागलो " या गीतामुळे तिचा आवाज घराघरात पोहोचला आहे. या गीताने रसिकांवर भुरळ घातली आहे. 'होणार सून मी ह्या घरची'मधलं 'नाही कळले कधी', 'तुझे माझे गाव', 'तुझ्यासवे' ही तिन्ही गाणी सावनीच्या नावे आहेत.याच मालिकेतल्या 'तुझ्यासवे' या गाण्याच्या सोलो व्हर्जनसोबत त्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे,या व्हिडीओ सावनीने नायिका आणि गायिका अशी दुहेरी भूमिका केलेली आहे.२०११ मध्ये संपन्न झालेल्या "आयडीया सा रे ग म पा" कार्यक्रमाच्या अंतिम फेरीतील ५ स्पर्धकांमध्ये सावनीचा समावेश होता.कोकणी भाषेतसद्धा तिने गाणी गायली आहेत.नुकतेच तिने तामिळ गायन क्षेत्रात पदार्पण केले आहे.आतापर्यंत तिने चार तामिळ गाणी गायली आहेत.

बालपण आणि शिक्षण

२२ जुलै १९८९ रोजी संगीताचा वारसा असलेल्या कुटुंबात सावनीचा जन्म झाला.

शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता असलेले तिचे वडील डॉ. रविंद्र घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकातील गायिका अभिनेत्री डॉ.वंदना घांगुर्डे ह्या मात्यापित्यांकडून तिला बालपणापासून संगीताचे धडे मिळाले. वडील डॉ. रविंद्र घांगुर्डे यांच्याकडून विविध रागरागिण्यांची ओळख करून घेतानाच सावनी नाट्यसंगीत आणि सुगम संगीतही गाऊ लागली.

वयाच्या ८ व्या वर्षापासून तिने मराठी सुगम संगीताचे शिक्षण सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पं. यशवंत देव यांच्याकडून घेण्यास सुरूवात केली. नादब्रम्ह परिवाराने आयोजित केलेल्या केलेल्या श्री यशंवत देव यांच्या अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी सादर केलेल्या 'देवगाणी' या कार्यक्रमात श्रीमती आशा भोसले यांच्या उपस्थितीत गायन करण्याची संधी तिला मिळाली. या कार्यक्रमातील तिचे गायन ऐकून महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी तिची निवड भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ऎ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणा-या महाराष्ट्राच्या संघात केली. १४ नोव्हेंबर २००२ रोजी सावनीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. याप्रसंगी यशंवत देवांनी रचलेल्य़ा गीताने आणि सावनीच्या स्वरांनी अवघे राष्ट्रपती भवन भारावून गेले होते!

पुण्यामधील फ़र्ग्युसन महाविद्यालयातून तिने आपले शिक्षण घेतले.मध्यंतरी फ़र्ग्युसन महाविद्यातर्फ़े काही निवडक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना युरोपमध्ये पाठवण्यात आले. त्या समूहामध्ये देखील सावनीचा समावेश होता.तिने रवि दाते यांच्याकड़े ग़ज़लच शिक्षण घेतले आहे तर पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.तिने बीए संस्कृत आणि एमए मराठीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे.भारती विश्वविद्यालयातून तिने एमए म्युजिक ही पदवी संपादित केलेली आहे

कारकीर्द

नादब्रह्म पुणे निर्मित व पार्श्वगायिका सावनी रवींद्र प्रस्तुत 'लताशा' हा लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या सुरेल कारकिर्दीवर आधारीत कार्यक्रम ती सादर करते.

'गझल का सफर', 'ब्लॅक ऍन्ड व्हाईट', 'गुलझार - बात पश्मिने कि' यासारख्या अनेक कार्यक्रमातून तिन आपल्या स्वरांची जादू पसरवली आहे. ब्लॅक ऍन्ड व्हाईट या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका, लंडन, दुबई, अबुधाबी इथंही झाले आहेत.अजय अतुल यांच्या दुबई,अमेरिका याठिकाणी झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तिने सहभाग घेतला होता.आतापर्यंत देशात तसेच परदेशात उदा.मस्कत,सिंगापूर,इस्त्राईल,कॅनडा,झिंम्बांबे या देशात तिचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

'अजिंठा','अजब लग्नाची गजब गोष्ट','भैरू पैलवान कि जय','ती रात्र', 'मानसन्मान', 'दांडगी मुलं','पाच नार एक बेजार','नीळकंठ मास्तर','गुरूपौर्णिमा','कुणी घर देता का घर','प्राइम टाइम','पिंडदान','शॉर्टकट','कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटांसाठी तिन पार्श्वगायन केलं आहे. संगीताचे कार्यक्रम, चित्रपट या बरोबरच तिचे 'आशाये' हा हिंदी, तर 'अजूनही' आणि 'कॅनव्हास' हे दोन मराठी अल्बम रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत.

'बंधन' सह्याद्री वाहिनी,'बे दुणे दहा'स्टार प्रवाह,'ढाबळ'स्टार प्रवाह,'कमला'कलर्स मराठी,'म्युजिक ट्रक'सह्याद्री वाहिनी,'पसंत आहे मुलगी','असं सासर सुरेख बाई' इत्यादी मालिकांची शीर्षकगीते आणि झीमराठीचे शीर्षकगीत तिने गायलेले आहे.

तिच्या 'सूर आनंदघन' ह्या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वरचेवर होत असतात.त्याबरोबर पं. यशवंत देव ह्यांच्या देवगाणी ह्या कार्यक्रमात आणि इतर कार्यक्रमात ज्येष्ठ गायक अरुण दाते, पं. सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रविंद्र जैन, उत्तरा केळकर, श्रीधर फडके यांच्याबरोबरही ती गायनाचे कार्यक्रम सादर करते.गेली 10 वर्ष ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक भावगंधर्व पं.हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या सोबत ती 'भावसरगम','शिवाकल्याण राजा','अमृताचा घनु' ह्या कार्यक्रमात ती सादरीकरण करते.युरोपियन मराठी संमेलन,२०१४,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,घुमान,२०१५,स्कॉटलंड,बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन,बोस्टन,अमेरिका,२०१५ या ठिकाणी तिने सादरीकरण केले आहे.

पारितोषिक आणि विजेतेपद

तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये बालकलाकारांना देण्यात येणारा शाहू मोडक पुरस्कार, मोरया फ़ाऊंडेशन तर्फ़े मोरया गोसावी पुरस्कार आणि रतिलाल भावसार पुरस्कार,अजितदादा पवार फ़ाऊंडेशन पुरस्कार,मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवार्ड २०१६ कार्यक्रमात गौरव,तेजस्विनी पुरस्कार ह्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

Back to TOP